संजीव मानकर
ग्रामीण प्रतिनिधी माहूर
माहूर:- तालुक्यातील गोकुळ गोंडेगांव येथे दि.२१ ऑगस्ट रोजी जल संधारण दिनानिमित्त सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून सरपंच राम लक्ष्मणराव सीडाम यांनी वृक्षारोपण करून झाडे वाचवा झाडे वाढवा हा संदेश देऊन नवसंजीवनी दिली आहे. माहूर तालुका कृषी विभागाचे कृषी सहाय्यक अजय सावळे, कृषी पोखरा समन्वयक किरण कानंदे व जल संधारण सहाय्यक बनसोडे हे या प्रसंगी उपस्थित होते. यांच्या नियोजनातुन गावातील रस्त्याच्या मुख्य चौकात तथा ग्रामपंचायत समोर भरपूर ऑक्सिजन देणारी झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. गावकऱ्यांनी याला भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिल्याने ग्रामपंचायत समोर वटवृक्ष लावला आहे. बिरसा मुंडा चौक येथेही वटवृक्ष लावला असून भविष्यात ही झाडे सर्व प्राणीमित्रास शुद्ध ऑक्सिजन देऊन नवसंजीवनी ठरतील असा ठाम विश्वास दर्शवत वृक्षारोपण केले. ग्रामपंचायत कार्यालया समोर याच विशालकाय वटवृक्षाच्या छायेत भावी नागरिकांनी ग्रामसभा घेण्यासाठी सज्ज रहावे असे भावनिक आवाहन करत एक घर एक रोपटे ही संकल्पना पुढे चालून राबविण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला आहे.
कृषी समन्वयक किरण कानंदे यांच्या सहकार्याने गावात पोखरा योजना अंतर्गत विविध कामांना सुरुवात झाली असून कृषी पंप, ठिबक सिंचन, वृक्षलागवड, फळबाग इत्यादी आवश्यक कामाचे ऑनलाईन अर्ज ते स्वतः गावात येऊन ऑनलाईन करतात.मंजूर कामांना प्राधान्याने पूर्ण करतात. अशी प्रसिध्दी प्राप्त किरण कानंदे यांचे उपस्थितांनी पूष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गोकुळ गोंडेगांव हे गाव पोखरा योजनेत समाविष्ट असून शेवटच्या घटकापर्यंत याचा लाभ देण्याचा संकल्प किरण कानंदे व अजय सावळे यांनी केला असून महिलांना शेतकरी प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वृक्षवल्लींवर प्रेम करणाऱ्या या गावात भरपूर प्रमाणात झाडे असून लिंब, पिंपळ, शेवगा, सीताफळ व इतर वृक्षवल्लींनी हे गाव बहरलेले असतांना कृषी सहाय्यक अजय सावळे यांच्या या अभिनव उपक्रमाने गोकुळ गोंडेगांव भारावून गेले आहे.



















