माहूर:- तालुक्यातील पडसा या गावात रस्त्यावर आपल्या कलागुणांचा अविष्कार दाखवणारे व पोटाची खळगी भरण्यासाठी मुलाबाळांसह बायकांना सोबत घेऊन गोड आवाजात गाणे गाणाऱ्या कलाकारांची होत असलेली उपेक्षा पाहून माहूर तालुक्यातील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे नेते, पंचशील विद्यालय लखमापूरचे संस्थापक अध्यक्ष, उभरत्या म. ज्योतिबा फुले सुतगिरणीचे अध्यक्ष प्रकाश दादा गायकवाड यांनी त्यांच्या राहत्या गावात पडसा येथे ह्या रस्त्यावरील कलाकारांना दि. २२ रोजी योग्य मान सन्मान देऊन अगदी रंग मंचावर उभे केल्याचे प्रत्येक्षदर्शी पहावयास मिळाले.
याच उपेक्षित कलाकारांनी आपल्या जोरदार शब्दफेकीच्या जोरावर रसिक श्रोत्यांना जागीच खिळवून ठेवल्याने रस्ते का माल सस्ते मे म्हणणाऱ्यांच्या तोंडावर चांगलीच चपराक बसली आहे. मुस्लिम समाजातील हे गायक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गीत गाऊन आंबेडकरी समाजाला एकीचा संदेश दिला आहे. चांद बाबु कव्वाल हा मुख्य गायक व शाहीर असून सकीना शेख, रिंदाना शेख व रहेमान शेख हे सह कलाकार असून ढोलकी वादकही तेच आहेत.
विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर तसेच यांचेही बिऱ्हाड पाठीवर असले तरी भल्या भल्या शाहिरांना लाजवेल एवढी ताकद त्यांच्या आवाजात असून लाखो रुपये देऊन शाहिरांना बोलावण्यापेक्षा अशा गरीब उपेक्षित कलाकारांची जाण ठेवून त्यांचाच योग्य सन्मान करावा असे मत प्रकाश दादा गायकवाड यांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकुमार कांबळे, जितेंद्र शेंडे, सुनील गायकवाड, विष्णू शेंडे, प्रदीप भगत,मिलिंद मुनेश्वर यांनी प्रयत्न केले.



















