संजीव मानकर
ग्रामीण प्रतिनिधी माहूर
माहूर:- तालुक्यातील मदनापूर येथे दि. ११ सप्टेंबर रोजी नवयुवक दुर्गा मंडळ यांच्या वतीने बैल पोळा निमित्त बैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आपला बैल आपला अभिमान हा उपक्रम गावोगावी राबवून शेतकऱ्यांचा खरा मित्र असलेल्या बैलांना गौरव प्राप्त व्हावा, त्यांना पुन्हा नव्याने ओळख प्राप्त व्हावी, बैलांचे संगोपन व्हावे, बैलांशिवाय पर्याय नाही आणि म्हणून बैल पोळ्याच्या निमित्ताने बैल सजावट स्पर्धा घेऊन शेतकऱ्यात नवचैतन्य निर्माण करण्याचा हा स्तुत्य उपक्रम घेण्यात आल्याचे आयोजक दिगांबर सुंकावार तथा शंकर गंधमवार अध्यक्ष नवयुवक दुर्गा मंडळ यांनी म्हटले आहे.
या बैल सजावट स्पर्धेचे पहिले बक्षीस २१०००रु.व सन्मान चिन्ह. दुसरे बक्षीस १५००० रु. व सन्मान चिन्ह. तिसरे बक्षीस ११०००रु.व सन्मान चिन्ह असे असून काही निकष व अटी ठेवण्यात आल्या होत्या. सजावट, स्वच्छता व सुदृढता हे निकष पार करणाऱ्या तसेच कासरा बंदी, वाजंत्रीसह व गर्दीतून १०० मीटर मंदिरापर्यंत डौलाने चालत येऊन निरीक्षकांनी गुण देई पर्यंत शांत थांबणे या सर्व निकष व नियमात वाई बाजारचे शेतकरी बालाजी मडावी यांची जोडी बसल्याने ते प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत. २१०००रु.व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा पंच कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पंच कमेटी व निरिक्षक म्हणून किशन सुंकावार मा. सभापती पंचायत समिती माहूर, गणेश टनमने, मारोती वाघाडे, मधुकर मुजमुले,डॉ.बाबा डाखोरे गोविंद नेवारे, प्रमोद कोगुरवार, गजानन डाखोरे, यांनी आपली चोख भूमिका पार पाडली. या सजावट स्पर्धेची चर्चा माहूर तालुक्यातील गावोगावी चालू असून विदर्भात यवतमाळ जिल्ह्यातही चालू आहे.बैल जोडीच्या सजावटीमळे बालाजी मडावी हे नाव आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहे.


















