संजीव मानकर
ग्रामीण प्रतिनिधी माहूर
माहूर:- तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे परंपरा नुसार दरवर्षी प्रमाणे या वर्षीही बैल पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. पावसा अभावी शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असली तरी बैलांच्या साज सजावटीत कशाचीही कंजुसी दिसून आली नाही. सायंकाळी ठिक ५ वाजता अगदी वाजत गाजत हनुमान मंदिराच्या पारावर बैलांना तोरणा खाली उभे केले. अंगावर चढवलेल्या अयनेदार झुलांनी सरजा राजा आज चांगलाच उठावदार दिसत होता. शिंगांना बांधलेले रंगी बेरंगी गोंडे सर्वांनाच आकर्षीत करणारे होते. पहिल्या सारखी शेतीची कामे नसल्याने खाऊन मस्तवाल झालेले तरण्याबांड बैलांना पोळ्यात सांभाळणे मुश्किल असतांना बळीराजा हो रे हो रे म्हणत कधी पाठीवर शाबासकी देत तर कधी रागातमा करत आवरत होता.
ज्ञानेश्वर गायकवाड यांनी पहाडी आवाजात गण म्हणत गौरा पार्वतीचा गजर केला व सर्वांनीच सुरात सुर मिळवून हरहर महादेव म्हणत मनोभावे गणाचा आनंद घेतला. प्रवीण पुरुषोत्तम डाखोरे पाटील हे गावचे मानकरी असून त्यांच्या हस्ते भरल्या तोरणातून गुढी फिरवण्यात आली. सर्व बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. महाआरतीचा मान नथ्थू श्रीरामजवार व रमेश पाटील यांना मिळाला.
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यासाठी पंच कमेटी म्हणून शंकर चहाकाटे विनोद ताटेवार शंकरराव गावंडे संतोष पिसलवार पुरुषोत्तम पाटील डाखोरे यांनी भारत नामदेवराव हातमोडे यांच्या नेतृत्वाखाली कामकाज पाहिले. बक्षीस देण्यासाठी योग्य जोड्याची निवडण्यात आल्या.
पहिले बक्षीस तंदुरुस्त जोडी व सजावट कैलास डाखोरे यांना राम पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. दुसरे बक्षीस उंच व मोठी जोडी प्रमोद पिसलवार यांना शंकर चहाकाटे यांच्या हस्ते देण्यात आले. तिसरे बक्षीस सबळ जोडी रवींद्र राम वानखेडे यांना बंडोपंत राकेश यांच्या हस्ते देण्यात आले. चौथे बक्षीस सजावटीसाठी सुरेंद्र उमरे यांना राजेंद्र राठोड यांच्या हस्ते देण्यात आले. पाचवे बक्षीस सर्वात लहान जोडी व आकर्षक सजावट सिद्धार्थ कांबळे यांना प्रकाश मडावी यांच्या हस्ते देण्यात आले.
बैल पोळ्याचा चोख बंदोबस्त पोलीस पाटील अमोल सोळंके यांचेकडे असल्याने ते सर्वांवर करडी नजर ठेवून होते. बैल पोळ्याची संपूर्ण जबाबदारी व सुत्रसंचालन भारत नामदेवराव हातमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यवाहक म्हणून प्रमोद डाखोरे पुंडलिक सुकले विजय धुपकरी सुनील गावंडे अनुराग धुपकरी आकाश जगताप अर्जुन कडूकर यांनी कामकाज पाहिले. बैल पोळ्याचे खास मानकरी प्रवीण डाखोरे पाटील यांनी महाआरती व नैवद्यानंतर पोळा फुटल्याचे जाहीर केले. सर्वांनी अगदी आनंद व हर्ष उल्हासात बैल पोळा साजरा झाल्याचा आनंद व्यक्त केला.


















