संजीव मानकर
ग्रामीण प्रतिनिधी माहूर
माहूर:-तालुक्यातील गोकुळ गोंडेगांव येथील ही घटना असून दि. ७ सप्टेंबर रोजी ह्या मुलींनी मम्मीडॉलच्या मम्मीचे प्रतिरूप साकारल्याने त्यांच्या मम्मीसह परिसरातील सर्व नातेवाईकांनी त्यांचे कौतुक केले. निरागस दिसणाऱ्या या मुलींचे नाव अनुष्का किशोर पाटील, आरवी आकाश महामुने व आपुलकी आशिष कांबळे असे असून ह्या तीन महिन्यापासून एकमेकांशी कट्टर मैत्री करून आहेत. अनुष्का ही ता. पवनी जि. भंडारा येथील रहिवासी असून मामाकडे आजोळी रहात आहे. आरवी ही पाचोंदा ता. माहूर येथील रहिवासी असून ती सुध्दा मामाकडे आजोळी आली आहे. आपुलकी ही गोकुळ गोंडेगांव येथील रहिवासी असून ती आई वडील व आजी आजोबा सह रहात आहे.
कांप्युटरच्या या युगात आयफोनचा जास्त वापर कोणी करत असतील तर ते लहान मुलं मुली करतात. कार्टून , छोटे रील्स, विनोदी जोक्स मुलांना ते फार आवडतात. एकदा जर का मोबाईल त्यांच्या हातात पडला रे पडला की १००%डाटा संपवूनच मुले थांबतात. काही मुलांचे मग पालक दिवसात दोन दोन वेळा २जीबी डाटा पॅक मारतात तरच मुले थांबतात. अन्यथा त्यांचा थयथयाट पाहवल्या जात नाही. मम्मी पप्पा झोपले तरीही मुलं मोबाईलवर आवडते कार्टून बघतच असतात. हेच शाश्वत सत्य आहे. केव्हाही मोबाईल, जेवतांना मोबाईल. झोपतांना मोबाईल. दिवसभर मोबाईल. रात्रभर मोबाईल. फक्त मोबाईल आणि मोबाईलच! अशा या मोबाईलच्या युगात ह्या तीन निरागस मुलींनी मोबाईल फोन बाजूला फेकून बाहुल्यांचा खेळ खेळतांना चक्क आईंची मिमिक्री करत मम्मी रूप साकारले आहे.
ह्या तिघी मुली आपल्या बाहुल्यांना (बेबी डॉल) कटिखांद्यावर घेऊन त्यांचा सांभाळ करण्याची क्षमता असल्याचे सिद्ध करत आहे. त्यांच्या बेबीला झोप पण लागत नाही. त्यांना बाहेर विहीरवर पाण्याला पण जायचं असते. तेव्हा रडू नको बाळा मी पाण्याला जाते हे गीत म्हणून आपल्या बेबीला झोपवण्याचा प्रयत्न जणू त्यांच्या भविष्यासाठी त्यांनी आजच कंबर कसली असल्याचे दिसून आले. आपलं स्त्रित्व व मातृत्व जपण्याची ही सुप्त शक्ती त्यांच्यामध्ये बालपणातच कुठून आली.? हा खेळ फक्त मनोरंजन करत नाही तर वर्तमानातील मम्मी पप्पांना एक चांगली चपराक देते. असे म्हणावे लागेल. कारण बाहुल्यांना अंघोळ घालणे, त्यांचा मेक अप करणे, त्यांना जेवायला देणे, झोपी घालणे, त्यांची देखभाल करणे ही आदर्श मातांची लक्षणे ह्या मुलींमध्ये आजच दिसून येत आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांकडनं हे शिकण्या सारखं आहे. त्यामुळे आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा बेबीडॉल द्या.खेळत असतील तर बिनधास्त खेळू द्या. मनसोक्त उड्या मारु द्या. चांगल्या गोष्टी ह्या जुन्या असतील परंतु चांगल्या असतील तर त्या जरूर स्वीकारा आणि पाल्यांनाही स्वीकारू द्या. कारण पाल्यांच आयुष्य हेच आपलं भविष्य आहे.



















