संजीव मानकर
ग्रामीण प्रतिनिधी माहूर
माहूर:- तालुक्यातील सायफळ या गावात दि. ११ सप्टेंबर रोजी मध्येरात्री नंतर एका वन्य प्राण्याने वृद्ध महिला लता माधव राऊत व कैलास मारोती वाघाडे या तरुणावर जीव घेणा हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे.सविस्तर वृत्त असे की शिकारीच्या शोधात असलेल्या त्या वन्य जीवाने चक्क गावात प्रवेश करून एका बकऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतांना अचानक समोरच्या छप्परीत झोपलेली लता माधव राऊत ही ६० वर्षीय महिला उठली आणि पहाते तर तिच्या समोर तिचा काळ उभा राहिलेला. रात्रीचा अंधार असल्याने तिला काही समजण्या आधीच तिच्यावर झडप घेत तिच्या मांडीचा जबर चावा घेऊन तिला रक्त बंबाळ केले आहे. हे पाहून बेभान झालेली लता राऊत हीने जीवाच्या आकांताने आरडाओरडा करताच कैलास मारोती वाघाडे हा ३०वर्षीय तरुण धावत आल्याने महिलेचा जीव वाचला असला तरी या तरुणावरही चढाई करत त्यालाही जबर चावा घेतल्याने सायफळ येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहे.
सध्या ही महिला सरकारी रुग्णालयात भरती असून कैलास वाघाडे सुद्धा यवतमाळ येथील रुग्णालयात भरती असल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे. हे सर्व खरे असले तरी या दोघांवर हल्ला करून जबर जखमी करणारा वाघच होता की इतर कोणता प्राणी होता या बाबत आता संशय कल्लोळ सुरू झाला आहे. गावाच्या मधोमध असणाऱ्या घरात वाघ येऊच शकत नाही. असाही तर्क काढला जात असून तरस हा प्राणी गावात येत असतो त्यामुळे तो तरस असावा असे बोलले जात आहे. कोणी म्हणत आहेत तो प्राणी कुत्र्यासारखा दिसत होता. कदाचित पिसाळलेला कुत्रा असू शकतो. कोणी म्हणत आहेत कुत्र्यासारखा दिसणारा प्राणी म्हणजे कोल्हा किंवा लांडगा असू शकतो. एकंदर रात्रीच्या अंधारात बकरीची शिकार करू पाहणारा प्राणी कोणीच कसा ओळखला नाही या बाबत शंका व्यक्त केली जात असली तरी एकाच वेळी दोघांना चावा घेऊन जबर जखमी करून रुग्णालयाची वाट दाखवणारा हा प्राणी हिंस्र पशुच असु शकतो. त्यामुळे शेत शिवारात काम करणाऱ्या महिला मजूर वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. असाच प्रकार मदनापूर या गावात सुद्धा घडला असून सिंधूबाई राऊत या महिलेच्याही मांडीलाच अनोळखी प्राण्याने चावा घेतला असल्याने तिला माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती मदनापूर येथील ग्राम रोजगार सहाय्यक भीमन्ना येलचटवार यांनी दिली आहे. एकाच रात्री शेजारच्या दोन गावात हा प्रकार घडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शेवटी वन विभाग या बाबत चौकशी व शहानिशा करून चावा घेणारा वन्य प्राणी कोणता? या बाबत खुलासा करतीलच अशी अपेक्षा असने काही गैर नाही.



















