संजीव मानकर
ग्रामीण प्रतिनिधी माहूर
माहूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वर्षावासानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन चिंतन व मनन आषाढी पौर्णिमा पासून चालू झाले असून एक महिना पूर्ण झाला आहे. अश्विन पौर्णिमेला ग्रंथ वाचनाची सांगता होणार असल्याची माहिती भंते आश्वलायन यांनी दिली असून धम्म पसार व जागृतीचे काम महाराष्ट्रभर चालू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माहूर तालुक्यातील गोकुळ गोंडेगांव सायफळ मदनापूर वाई बाजार पडसा आष्टा लिंबायत माहूर अशा अनेक गावात बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन सुरू आहे.
तथागत भगवान गौतम बुद्धांनी वर्षावास चालू केला असून तीन महिने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत खूप पाऊस असायचा त्यामुळे धम्माचा प्रचार करण्यासाठी भिक्षूंना अडचणी यायच्या. ज्या ठिकाणी जायचे तिथे वेळेत पोहोचणे अशक्य व्हायचे. अनेक भिक्षू बिमार पडायचे. प्रसंगी एखाद्या भिक्षूंना आहे त्या स्थितीत सोडून जावे लागत असायचे. पावसाळ्यात नदी नाले तुडुंब भरून वहात असल्याने रस्ता ओलांडून जाणे जीवघेणे ठरायचे आणि म्हणूनच तथागताने तीन महिने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत
एकाच ठिकाणी मुक्कामास राहून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा निर्णय घेतला यासच वर्षावास संबोधले जाते. असे भंते आश्वलायन यांनी प्रवचनातून उपासक आणि उपासिकांना सांगितले आहे.
पुढे ते असेही म्हणाले की १४ आक्टोबर १९५६ साली स्वत: व आपल्या लाखो धम्म बांधवांच्या सोबत घेतलेल्या धम्म दीक्षा नंतर भारतात बुद्ध धम्म पून्हा नव्याने पुनर्जीवित झाला. त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मेहनतीने, बिमार असतांना सुद्धा जीवाची बाजी लावून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला. माईसाहेब सविता आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांना या कामी खूप साथ दिली. हिंमतीने ती सोबत राहिली. याच ग्रंथाची शेवटची प्रस्तावना लिहिल्या नंतर बाबासाहेब जोराने हाक देत माईसाहेबांना म्हणाले आज माझी शेवटची इच्छा पूर्ण झाली आहे. मी यापुढे राहिल किंवा नाही राहिल पण हा माझा ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्म कायम माझ्या धम्म बांधवांना प्रेरणा देत राहिल. या ग्रंथ पूर्तीने बाबासाहेबांना खूपच आनंद झाला होता. याच आनंदाच्या भरात त्यांनी हा ग्रंथ आपल्या छातीशी धरला आणि गाढ झोपी गेले ते कायमचेच. पून्हा ते उठलेच नाही आणि म्हणून या ग्रंथाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून वर्षावास काळात याच ग्रंथाचे वाचन करून धम्म कार्य पुढे घेऊन जाण्याची आपली जबाबदारी आहे. हे सर्वांनी समजून घ्यावे असे भावनिक आवाहन भंते आश्वलायन यांनी केले आहे.



















